■ गझल : ज्याची ओंजळ भरली त्याला कणगी सुचली

गझल : ज्याची ओंजळ भरली त्याला कणगी सुचली

ज्याची ओंजळ भरली त्याला कणगी सुचली 
ज्याची मूठ रिकामी त्याला चोरी सुचली 

एक वीट अन त्यावर विठ्ठलमूर्ती सुचली
अभंगरचना कुणास सुंदर इतकी सुचली 

ज्याची हिम्मत पक्की तो हा डोंगर चढला
ज्याची हिम्मत खचली त्याला खाई सुचली 

आधी पोपट सुचला फांदीवर बसलेला
मग फांदीवर हिरवी हिरवी कैरी सुचली

टेबलवरती होती तोवर वाचायाचो
उगी पुस्तकांसाठी ही अलमारी सुचली 

गावावरची कविता लिहिली शहरामध्ये
शहरावरची कविता मजला गावी सुचली

फक्त मिठीने एका भांडण मिटले असते
गोष्ट मला ही वेळेवर का नाही सुचली 

एक उदासी पहाड बनुनी उभी राहिली
पहाडात त्या मज बुद्धाची लेणी सुचली 

- वैभव देशमुख

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती