■ गझल : तुटला आहे तर तुटल्याला द्यावे काही...
गझल : तुटला आहे तर
तुटल्याला द्यावे काही...
तुटला आहे तर
तुटल्याला द्यावे काही
तुटलेल्या तार्याला
का मागावे काही
दु:खाने वेदना
दिल्या तर अश्रू द्यावे
आपणसुद्धा देणार्याला
द्यावे काही
तुटून गेले किती
सहज ते अतूट धागे
ठरून गेले फोल
आपले दावे काही
दुसऱ्याच्या
टाचणीकडे का बघत बसावे
फुगे आपले आपणहुन
फोडावे काही
सगळ्यांना मौनाची
भाषा कळते कोठे
लागत असते काहींशी
बोलावे काही
रिमोट, मोबाईल, भांडयांना फोडुन झाले
फुटेल दुनिया असे
अता फोडावे काही
हवा चांगला गळा
असे आवश्यक नाही
गावे वाटत आहे तर
मग गावे काही
छानच होते काही
जखमांचे ते ठणके
छानच होते
आयुष्याचे चावे काही
कधीतरी अपुल्या
भेटीला अर्थ मिळावा
कधीतरी अपुल्या
भेटीचे व्हावे काही
- वैभव देशमुख
Comments
Post a Comment