■ गझल : भोग सोबत आपला येतो





गझल : भोग सोबत आपला येतो

भोग सोबत आपला येतो
कोण येथे एकटा येतो

धूळ उडवत लाख अर्थांची
अक्षरांचा काफला येतो

काम करते हृदय हे कुठले
सारखा आवाज का येतो

संपतो हातातला पैसा
मग खरा खालीपणा येतो

प्राण येतो...पाखरू येते
देह येतो...पिंजरा येतो

हो, खिसा कफनास नसतो...पण
अंगवस्त्रांना खिसा येतो

मी कसा उदगार बांधावा
प्रश्न कायम आडवा येतो

पाहिला आहे खडा टाकुन
पण तुझा अंदाज ना येतो

चंद्र भटका आजही गगनी
घेउनी भुरका ससा येतो

सूर्य येतो उगवता अपुला
अन थवाही उडवता येतो

रोज गर्दीतून मरणांच्या
तू घरी अपुल्या कसा येतो

काळ आहे एक बहुरूपी
रूप बदलुन सारखा येतो

- वैभव देशमुख 

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती