Posts

Showing posts from June, 2020

गझल : खुले झाले उभे अस्मान सगळ्यांना

खुले झाले उभे अस्मान सगळ्यांना जमावे बस अता उड्डान सगळ्यांना कितींचा जन्म जातो पिंपळाखाली कुठे ते प्राप्त होते ज्ञान सगळ्यांना असोनी पंख सरपटतात मातीवर कुठे झेपावण्याचे भान सगळ्यांना तुझी ऐपतहि आहे आणि दानतही कुठे मिळते असे वरदान सगळ्यांना स्वत:ला ठेवली ना पानभर छाया दिले वाटून पानन् पान सगळ्यांना तुला खडकातली खळखळ कळू येते कुठे मिळतात असले कान सगळ्यांना - वैभव देशमुख

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू नव्या काळात या भलता जुना आहेस तू कधीपासून काही बातमी नाही तुझी कुठे आहे... कुठे माझ्या मना आहेस तू जगाला वाटते धोका दिला आहेस पण; दिली मजला खरेतर चालना आहेस तू कधी तू पाहिले डोळ्यात रोखूनी तुझ्या कधी केला स्वत:चा सामना आहेस तू जगाची वेदना नुसताच पाहत राहतो कशासाठी दिली संवेदना आहेस तू किती बिंबे तुझ्यावर हालताना पाहतो कुणाचा नेमका माझ्या मना आहेस तू - वैभव देशमुख

गझल : झुळुक एखादी अशी बलवान असते

झुळुक एखादी अशी बलवान असते विश्व त्या झुळकीत पिकले पान असते मी किती गगनास ओलांडून आलो मोजले असते मला जर भान असते परग्रहावर थाटला संसार असता आपल्या जर मालकीचे यान असते मागच्या गाड्या पुढे जातात निघुनी आपले कोठे कळेना ध्यान असते फायदा नुकसान करतो कैकवेळा... फायद्याचे कैकदा नुकसान असते खेळ कुठला खेळती ते कोण जाणे फक्त मुंगीएवढे मैदान असते वेदनेचा खूप मी सन्मान करतो वेदना संवेदनेचे दान असते वाटते भीती स्वत:ला भेटण्याची शहर ज्यावेळेस हे सुनसान असते - वैभव देशमुख

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती मनाची ही स्थिती आधी कुठे होती उदासी एवढी आधी कुठे होती कुठे या पापणीला यायचे तारे अशी ही पापणी आधी कुठे होती सुखाची वेल होती डवरली नुसती सुखाला या कळी आधी कुठे होती कुठे इतके कठिण होते इथे जगणे... मराया रांग ही आधी कुठे होती तुझ्या भाळी सुखाने ओठ टेकवले तुझ्या गाली खळी आधी कुठे होती मलाही देह हा होता कुठे आधी तुलाही सावली आधी कुठे होती - वैभव देशमुख