गझल : झुळुक एखादी अशी बलवान असते

झुळुक एखादी अशी बलवान असते
विश्व त्या झुळकीत पिकले पान असते

मी किती गगनास ओलांडून आलो
मोजले असते मला जर भान असते

परग्रहावर थाटला संसार असता
आपल्या जर मालकीचे यान असते

मागच्या गाड्या पुढे जातात निघुनी
आपले कोठे कळेना ध्यान असते

फायदा नुकसान करतो कैकवेळा...
फायद्याचे कैकदा नुकसान असते

खेळ कुठला खेळती ते कोण जाणे
फक्त मुंगीएवढे मैदान असते

वेदनेचा खूप मी सन्मान करतो
वेदना संवेदनेचे दान असते

वाटते भीती स्वत:ला भेटण्याची
शहर ज्यावेळेस हे सुनसान असते

- वैभव देशमुख

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती