गझल : खुले झाले उभे अस्मान सगळ्यांना

खुले झाले उभे अस्मान सगळ्यांना
जमावे बस अता उड्डान सगळ्यांना

कितींचा जन्म जातो पिंपळाखाली
कुठे ते प्राप्त होते ज्ञान सगळ्यांना

असोनी पंख सरपटतात मातीवर
कुठे झेपावण्याचे भान सगळ्यांना

तुझी ऐपतहि आहे आणि दानतही
कुठे मिळते असे वरदान सगळ्यांना

स्वत:ला ठेवली ना पानभर छाया
दिले वाटून पानन् पान सगळ्यांना

तुला खडकातली खळखळ कळू येते
कुठे मिळतात असले कान सगळ्यांना

- वैभव देशमुख

Comments

Popular posts from this blog

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती