Posts

Showing posts from April, 2020

■ गझल : बोलत असतो खोटे आपण...

गझल : बोलत असतो खोटे आपण... बोलत असतो खोटे आपण किती वाहतो ओझे आपण खूप पुढे गेली ही दुनिया खूप राहिलो मागे आपण ज्या झाडाची मुळे हरवली त्या झाडाची पाने आपण कधी कधी कवडीमोलाने विकले आहे सोने आपण कधी जुनी उघडून डायरी वाचत बसतो पत्ते आपण काळे आपण मातीहुनही सोन्याहुनही पिवळे आपण तेव्हा भरले आपण भाडे आता भरतो हप्ते आपण जळते आहे चिता आपली धरले आहे मडके आपण ऐकत नाही मन अजूनही किती द्यायचे चटके आपण कोणी येइल वाटत नाही बंद करूया दारे आपण - वैभव देशमुख 

■ गझल : तुटला आहे तर तुटल्याला द्यावे काही...

गझल : तुटला आहे तर तुटल्याला द्यावे काही... तुटला आहे तर तुटल्याला द्यावे काही तुटलेल्या तार्‍याला का मागावे काही दु:खाने वेदना दिल्या तर अश्रू द्यावे आपणसुद्धा देणार्‍याला द्यावे काही तुटून गेले किती सहज ते अतूट धागे   ठरून गेले फोल आपले दावे काही   दुसऱ्याच्या टाचणीकडे का बघत बसावे   फुगे आपले आपणहुन फोडावे काही   सगळ्यांना मौनाची भाषा कळते कोठे लागत असते काहींशी बोलावे काही रिमोट , मोबाईल , भांडयांना फोडुन झाले फुटेल दुनिया असे अता फोडावे काही हवा चांगला गळा असे आवश्यक नाही गावे वाटत आहे तर मग गावे काही   छानच होते काही जखमांचे ते ठणके   छानच होते आयुष्याचे चावे काही कधीतरी अपुल्या भेटीला अर्थ मिळावा कधीतरी अपुल्या भेटीचे व्हावे काही -    वैभव देशमुख  

■ गझल : क्षितीजावर निरोपाचा प्रहर आहे

गझल : क्षितीजावर निरोपाचा प्रहर आहे  क्षितीजावर निरोपाचा प्रहर आहे किती कातर निरोपाचा प्रहर आहे   फुटे घागर निरोपाचा प्रहर आहे उडे केशर निरोपाचा प्रहर आहे तिथे तू दूर मैलो माझियापासुन नि हाकेवर निरोपाचा प्रहर आहे  उदासी दाटली सार्‍या जगावरती जणू जगभर निरोपाचा प्रहर आहे  दवाचा प्रहर होता भेटलो तेव्हा किती खडतर निरोपाचा प्रहर आहे जरा दे हात हाती आणि पाहु दे तुला क्षणभर... निरोपाचा प्रहर आहे जवळ आलेत सारे दूर गेलेले किती सुंदर निरोपाचा प्रहर आहे - वैभव देशमुख  

■ गझल : कबीले आसवांचे चालते झाले...

गझल : कबीले आसवांचे चालते झाले... कबीले आसवांचे चालते झाले तुला बघताच डोळे वाहते झाले   तडे बुरुजास गेले निग्रहाच्या अन् मनोरे संयमाचे हालते झाले उदासी, स्वप्न, प्रीती, दु : ख, आशा, भय... मना, माहित तुझे सारे पते झाले   अशी काही कुदळ बसली मनावरती मनाचे पात्र अवघे वाहते झालेेेे तुझ्याविण काम माझे कोठले होइल तुझ्याविण काम माझे कोणते झाले नवस केला तुझ्या साक्षात भेटीचा जगीचे देव सारे पावते झाले तुझ्या लक्षात मी राहीन का आता तुझे लक्ष्यात आता चाहते झाले अता तू मस्तपैकी ओढ रेघोट्या जिवाचे पीठ माझ्या आयते झाले कि होते लोक आधी हे ऊसावाणी    कि त्यांचे फार नंतर कोयते झाले  - वैभव देशमुख

■ गझल : ज्याची ओंजळ भरली त्याला कणगी सुचली

गझल : ज्याची ओंजळ भरली त्याला कणगी सुचली ज्याची ओंजळ भरली त्याला कणगी सुचली  ज्याची मूठ रिकामी त्याला चोरी सुचली  एक वीट अन त्यावर विठ्ठलमूर्ती सुचली अभंगरचना कुणास सुंदर इतकी सुचली  ज्याची हिम्मत पक्की तो हा डोंगर चढला ज्याची हिम्मत खचली त्याला खाई सुचली  आधी पोपट सुचला फांदीवर बसलेला मग फांदीवर हिरवी हिरवी कैरी सुचली टेबलवरती होती तोवर वाचायाचो उगी पुस्तकांसाठी ही अलमारी सुचली  गावावरची कविता लिहिली शहरामध्ये शहरावरची कविता मजला गावी सुचली फक्त मिठीने एका भांडण मिटले असते गोष्ट मला ही वेळेवर का नाही सुचली  एक उदासी पहाड बनुनी उभी राहिली पहाडात त्या मज बुद्धाची लेणी सुचली  - वैभव देशमुख

■ गझल : कुठे हृदयातले बोलायला येते

गझल : कुठे हृदयातले बोलायला येते कुठे हृदयातले बोलायला येते  कुठे इतके खरे बोलायला येते  मला वाचा दिली आहेस तू कविते मला तुझियामुळे बोलायला येते  मुका असतो बसुन जेव्हा कुठेही मी  स्मरण मजला तुझे बोलायला येते  तुझे डोळे किती हे बोलके दोन्ही कुठे यांच्यापुढे बोलायला येते  मला कळतात ही बोलायची वळणे  मलाही वाकडे बोलायला येते पुढे आलो तुझ्या की मौन होतो मी  उभ्या दुनियेपुढे बोलायला येते  - वैभव देशमुख