Posts

गझल : खुले झाले उभे अस्मान सगळ्यांना

खुले झाले उभे अस्मान सगळ्यांना जमावे बस अता उड्डान सगळ्यांना कितींचा जन्म जातो पिंपळाखाली कुठे ते प्राप्त होते ज्ञान सगळ्यांना असोनी पंख सरपटतात मातीवर कुठे झेपावण्याचे भान सगळ्यांना तुझी ऐपतहि आहे आणि दानतही कुठे मिळते असे वरदान सगळ्यांना स्वत:ला ठेवली ना पानभर छाया दिले वाटून पानन् पान सगळ्यांना तुला खडकातली खळखळ कळू येते कुठे मिळतात असले कान सगळ्यांना - वैभव देशमुख

गझल : अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू

अधिक आहे जमाना अन् उणा आहेस तू नव्या काळात या भलता जुना आहेस तू कधीपासून काही बातमी नाही तुझी कुठे आहे... कुठे माझ्या मना आहेस तू जगाला वाटते धोका दिला आहेस पण; दिली मजला खरेतर चालना आहेस तू कधी तू पाहिले डोळ्यात रोखूनी तुझ्या कधी केला स्वत:चा सामना आहेस तू जगाची वेदना नुसताच पाहत राहतो कशासाठी दिली संवेदना आहेस तू किती बिंबे तुझ्यावर हालताना पाहतो कुणाचा नेमका माझ्या मना आहेस तू - वैभव देशमुख

गझल : झुळुक एखादी अशी बलवान असते

झुळुक एखादी अशी बलवान असते विश्व त्या झुळकीत पिकले पान असते मी किती गगनास ओलांडून आलो मोजले असते मला जर भान असते परग्रहावर थाटला संसार असता आपल्या जर मालकीचे यान असते मागच्या गाड्या पुढे जातात निघुनी आपले कोठे कळेना ध्यान असते फायदा नुकसान करतो कैकवेळा... फायद्याचे कैकदा नुकसान असते खेळ कुठला खेळती ते कोण जाणे फक्त मुंगीएवढे मैदान असते वेदनेचा खूप मी सन्मान करतो वेदना संवेदनेचे दान असते वाटते भीती स्वत:ला भेटण्याची शहर ज्यावेळेस हे सुनसान असते - वैभव देशमुख

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती

गझल : मनाची ही स्थिती आधी कुठे होती मनाची ही स्थिती आधी कुठे होती उदासी एवढी आधी कुठे होती कुठे या पापणीला यायचे तारे अशी ही पापणी आधी कुठे होती सुखाची वेल होती डवरली नुसती सुखाला या कळी आधी कुठे होती कुठे इतके कठिण होते इथे जगणे... मराया रांग ही आधी कुठे होती तुझ्या भाळी सुखाने ओठ टेकवले तुझ्या गाली खळी आधी कुठे होती मलाही देह हा होता कुठे आधी तुलाही सावली आधी कुठे होती - वैभव देशमुख

■ गझल : भूक आहे, तहानही आहे

■ गझल : भूक आहे, तहानही आहे भूक आहे, तहानही आहे पेटले आसमानही आहे दान करतो लपून देवाला पापि तो पुण्यावानही आहे काय करु ते कुणा कळत नाही वेळ दोलायमान ही आहे भाळतो कोण फक्त रूपाला... ती बया बुद्धिमानही आहे (गझल करतोन् गीतही रचतो एक त्याचे दुकानही आहे ) घ्या सबादून चूक पोराची अजुन थोडा लहानही आहे ( सर्व शहरास समजले आता एक कोणी "वुहान"ही आहे) लावतो आकडे, पितो गांजा त्यास अध्यात्म ज्ञानही आहे ओढतो लाल सूर्य सांजेचा मी पितो गर्द रानही आहे - वैभव देशमुख 

■ गझल : उदासीचे नवे थर या बघायाला

■ गझल : उदासीचे नवे थर या बघायाला उदासीचे नवे थर या बघायाला मनाचे हे नवे घर या बघायाला कधी संपेल याची श्वाश्वती नाही सुरू झालाय पिक्चर या बघायाला किती फुललीत कमळे ही उजेडाची तमाचे हे सरोवर या बघायाला अजुन हे लोक त्यांच्या भाकरी भवती कसे फिरतात गरगर या बघायला पुढे आहे भयानक दृष्य डोळ्यांनो कसुन आधीच कंबर या बघायाला बघायासारखे नाही शहर आता तरीही वाटते तर या बघायला तुम्हासाठीच त्याची जिंदगी झिजली अता झालाय जर्जर... या बघा याला उद्या होणार आहे एक तारा मी तुम्हाला यायचे तर या बघायाला - वैभव देशमुख

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला जगाने ठेवले पाण्यात देवाला कसा मागायचा आधार बुडत्याला हसू, अश्रू, निराशा, दु:ख, आशा, सल फळे आली किती एकाच झाडाला अशी का माणसांनी झाकली तोंडे गुन्हा हातून यांच्या कोणता झाला उभा तो वेगळ्या लोकांमधे आहे तुझा आवाज नाही यायचा त्याला जगाचे वाहतो सुखदु:ख कवितेतुन किती असणार किंमत या हमालाला उन्हे येतील आता गारव्यासाठी अता होईल पिवळा आपला पाला उद्या गावातुनी या जाउया निघुनी पहाटे पाचला तू पोच फाट्याला - वैभव देशमुख