Posts

Showing posts from May, 2020

■ गझल : भूक आहे, तहानही आहे

■ गझल : भूक आहे, तहानही आहे भूक आहे, तहानही आहे पेटले आसमानही आहे दान करतो लपून देवाला पापि तो पुण्यावानही आहे काय करु ते कुणा कळत नाही वेळ दोलायमान ही आहे भाळतो कोण फक्त रूपाला... ती बया बुद्धिमानही आहे (गझल करतोन् गीतही रचतो एक त्याचे दुकानही आहे ) घ्या सबादून चूक पोराची अजुन थोडा लहानही आहे ( सर्व शहरास समजले आता एक कोणी "वुहान"ही आहे) लावतो आकडे, पितो गांजा त्यास अध्यात्म ज्ञानही आहे ओढतो लाल सूर्य सांजेचा मी पितो गर्द रानही आहे - वैभव देशमुख 

■ गझल : उदासीचे नवे थर या बघायाला

■ गझल : उदासीचे नवे थर या बघायाला उदासीचे नवे थर या बघायाला मनाचे हे नवे घर या बघायाला कधी संपेल याची श्वाश्वती नाही सुरू झालाय पिक्चर या बघायाला किती फुललीत कमळे ही उजेडाची तमाचे हे सरोवर या बघायाला अजुन हे लोक त्यांच्या भाकरी भवती कसे फिरतात गरगर या बघायला पुढे आहे भयानक दृष्य डोळ्यांनो कसुन आधीच कंबर या बघायाला बघायासारखे नाही शहर आता तरीही वाटते तर या बघायला तुम्हासाठीच त्याची जिंदगी झिजली अता झालाय जर्जर... या बघा याला उद्या होणार आहे एक तारा मी तुम्हाला यायचे तर या बघायाला - वैभव देशमुख

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला

गझल : जगाने ठेवले पाण्यात देवाला जगाने ठेवले पाण्यात देवाला कसा मागायचा आधार बुडत्याला हसू, अश्रू, निराशा, दु:ख, आशा, सल फळे आली किती एकाच झाडाला अशी का माणसांनी झाकली तोंडे गुन्हा हातून यांच्या कोणता झाला उभा तो वेगळ्या लोकांमधे आहे तुझा आवाज नाही यायचा त्याला जगाचे वाहतो सुखदु:ख कवितेतुन किती असणार किंमत या हमालाला उन्हे येतील आता गारव्यासाठी अता होईल पिवळा आपला पाला उद्या गावातुनी या जाउया निघुनी पहाटे पाचला तू पोच फाट्याला - वैभव देशमुख

गझल : जिंकलो रण… मी पुढे आलो

गझल : जिंकलो रण … मी पुढे आलो   जिंकलो रण … मी पुढे आलो मारले मन … मी पुढे आलो... एक विंडोसीट आवडली   एक स्टेशन मी पुढे आलो मारला पाठी कुणी धक्का आणि धपकन मी पुढे आलो जिंकणार्‍याची स्तुती केली... हारलो पण मी पुढे आलो एक तपभर चालल्यानंतर एक काकण मी पुढे आलो ज्याक्षणी नव्हता तुझ्याकडुनी एकही जन...मी पुढे आलो काय मरणाचे मला आता काय जीवन...मी पुढे आलो खूप माझ्यासारखे होते एकटा पण मी , पुढे आलो सोड आता...सोड...मुड गेला लाव झाकण मी पुढे आलो - वैभव देशमुख  

■ जडी बुटीच्या पिशव्या होत्या

■ जडी बुटीच्या पिशव्या होत्या... जडी बुटीच्या पिशव्या होत्या घरोघरी म्हातार्‍या होत्या चर्येवरच्या सुरकुत्यांमधे कथा-कहाण्या दडल्या होत्या डोळ्यांमधल्या दोन बाहुल्या आता बाया झाल्या होत्या लाल टपोर्‍या कुंकाखाली हिरव्या हिरव्या इच्छा होत्या जिवंत असण्याच्या मरणाच्या सगळ्या रेषा बुजल्या होत्या अजून दु:खाच्या ओठाला चिकटवलेल्या पट्ट्या होत्या थरथरणाऱ्या हातांमध्ये लाख उबेच्या लाटा होत्या कुठे कुठे घेऊन जायच्या गप्पांमध्ये गाड्या होत्या - वैभव देशमुख 

■ गझल : भोग सोबत आपला येतो

गझल : भोग सोबत आपला येतो भोग सोबत आपला येतो कोण येथे एकटा येतो धूळ उडवत लाख अर्थांची अक्षरांचा काफला येतो काम करते हृदय हे कुठले सारखा आवाज का येतो संपतो हातातला पैसा मग खरा खालीपणा येतो प्राण येतो...पाखरू येते देह येतो...पिंजरा येतो हो, खिसा कफनास नसतो...पण अंगवस्त्रांना खिसा येतो मी कसा उदगार बांधावा प्रश्न कायम आडवा येतो पाहिला आहे खडा टाकुन पण तुझा अंदाज ना येतो चंद्र भटका आजही गगनी घेउनी भुरका ससा येतो सूर्य येतो उगवता अपुला अन थवाही उडवता येतो रोज गर्दीतून मरणांच्या तू घरी अपुल्या कसा येतो काळ आहे एक बहुरूपी रूप बदलुन सारखा येतो - वैभव देशमुख 

■ फक्त कविता सांग तू निरुपण नको

फक्त कविता मांड तू निरुपण नको फक्त चेहरा दाव तू दर्पण नको पाखरे होतील नरभक्षी उद्या एवढी फिरवायला गोफण नको वाटते आहे मनातुन भेटुया वाटते आहे मनातुन...पण नको हो तुला जे व्हायचे, घे काळजी... चंदनाचे व्हायला सरपण नको (काळ जेव्हा लागतो शिकवायला वाटते कुठलेच अध्यापन नको) भेटण्याची लाभली आहे मुभा पण अजुन भेटायला आपण नको - वैभव देशमुख  

■ गझल : फुलांचे ते दिवस निसटून जाण्याला

■ गझल : फुलांचे ते दिवस निसटून जाण्याला फुलांचे ते दिवस निसटून जाण्याला किती झाला जमाना त्या जमान्याला उतरली राधिका यमुनेत न्हाण्याला निळा आला किती हा रंग पाण्याला उडाले पाखरू आभाळ होण्याला निळ्या रंगामधे मिसळून जाण्याला किती मित्रांमधे वाटून घेण्याला मिळायचे किती सुख चार आण्याला अता भेटी कुठे माझ्या तुझ्या भेटी अता कोठे ठिकाणा तो ठिकाण्याला अजुनही लाल रंगाचीच ती यस्टी पकडतो मी जुन्या दिवसात जाण्याला अजुन लाटांवरी मी डूचमळत आहे अजुन मी लागलो नाही ठिकाण्याला पुन्हा करतो गुलामी त्याच प्रश्नांची पुन्हा जुंपून घेतो त्याच घाण्याला कधी ठकठक मनाची थांबते अपुल्या कधी असते सुटी या कारखान्याला कटी घेऊन घागर लाल सूर्याची नदीमध्ये उतरली सांज पाण्याला पुन्हा भेटू जुन्या गुलमोहराखाली 'बसू' थोडे फुलांच्या शामियाण्यालाया - वैभव देशमुख 

■ गझल : शुभ्र सारेच या जगात जणू...

गझल : शुभ्र सारेच या जगात जणू...  शुभ्र सारेच या जगात जणू डाग अपुल्याच फक्त आत जणू एक इच्छा सळाळतेय किती टाकली नेमकीच कात जणू काम मजलाच सांगती सारे फक्त आहे मलाच हात जणू चांदणे सांडले सुरात तुझ्या चंद्र आहे तुझ्या गळ्यात जणू टोचुनी टाचण्या फुटत नाही फोम भरले तुझ्या फुग्यात जणू सारखे खळखळून हे हसणे खूप आहेस तू सुखात जणू एक अश्रू न डोळियात तुझ्या प्राण परतेल या शवात जणू देव बनले कुणी, कुणी साधू राहिलो मीच माणसात जणू -     वैभव देशमुख

■ गझल : जर्द उन्हाला गर्द सावल्या होत्या...

गझल : जर्द उन्हाला गर्द सावल्या होत्या... जर्द उन्हाला गर्द सावल्या होत्या कविता माझ्या माझा पाला होत्या   म्हटले तर त्या साध्या टिचक्या होत्या म्हटले तर आगीच्या तोफा होत्या नकळे कसले वाटप चालू होते जागोजागी नुसत्या रांगा होत्या दुनिया सारी घरात बसली होती पार्किंगमध्ये सगळ्या गाड्या होत्या   कोणाच्या पायाला होती कुरूपे कोणाच्या पायाला चिखल्या होत्या  कमरेवरती चिल्ली पिल्ली होती डोईवरती हंडे-कळशा होत्या एकाच्या हाताला होती बंदुक दुसर्‍याने गोळ्या चालवल्या होत्या पाहत होतो मी काळाच्या पुढचे काळाच्या भिंतीला भेगा होत्या -     वैभव देशमुख